जीवन
जीवन हे क्षणभंगुर आहे हे खरंय , पण निसर्गाच्या सान्निध्यात असताना मात्र ही क्षणभंगुरता मनाला चुटपूट लावून जात नाही उलट आश्वस्त करते . ऋतूनुसारंच काय तर अगदी दिवसागणिक , प्रहराप्रमाणे किंबहुना क्षणाक्षणाला बदलणारा हा भवताल , झाडं, पानं ,फुलं .. त्यांचे रंग आणि लोभस छटा ....हा माझा अतिशय जिवाभावाचा विषय . जो मला जाणवतो आणि जगवतो देखील . तर या सातत्याने होणाऱ्या बदलांच्या मागे या पृथ्वीची सातत्यपूर्ण अस्थिरता , गतिमानता हीच कारणीभूत आहे असं लक्षात येतं ! कॅमेरा हातात घेतला तेव्हा हे सारं अजून प्रकर्षानं जाणवायला लागलं . एखाद्या दिवशी सहज काही सुंदर मनाला भावून जावं .. उदाहरणार्थ घ्या एखादा सुंदर फुलांचा घोस . आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी जावं तर आश्चर्यकारक रित्या सारं बदललेलं असतं .ते रंग ,छटा आणि त्याचबरोबर तो प्रकाश, ती वेळ ,आपण ज्या angle ने ते दृश्य पाहिलं ती जागा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सारं मनाला भावलं त्यावेळचा आपला तो मूड ! कालच्या दिवशी जे पाहिलं आणि डोळ्यात साठलं ,मनात उमटलं ते सारं त्या क्षणाचं होतं , त्या क्षणाच्या मालकीचं होतं ..... जे या क्षणी आहे ते आता पुन्हा नाही बहुदा कधीच नाही . मग आता काय ? ही हिरमुसलं व्हायची गोष्टंय ? मुळीच नाही . जशी एका लाटेनंतर दुसरी लाट येतंच रहाते निरंतर, कधी असते ती आधीच्या लाटेपेक्षा मोहक शुभ्र फेसाळलेली दमदार , तसा येणारा क्षण असू शकतो अजून नाविन्यपूर्ण , चित्तवेधक ! हा निरंतर ड्रामा आहे भूतलावरचा ! नवनवीन नेपथ्य ,बदलणारी प्रकाश योजना ,रोज नवीन कलाकार ,आगळी वेशभूषा ,वेगळा अभिनय !!! हे सारं पाहून आपलं मन नाही रमलं नं तरच नवल ! अरे आज हे असंय पण उद्या हे कसं असेल असं म्हणत आपल्याला उत्सुकतेच्या उंबरठ्यावर थोपवुन येत रहाते पुढची आणि मग अजूनच पुढची क्षणिका ..... हे येणाऱ्या पुढच्या क्षणाबद्दलचे कुतूहलच तुम्हाला वाट पहायला आणि जगायला शिकवतं ... कही यही तो नही नाम जिंदगीका ?