प्रतिक्षा
आज कॅमेरा नाहीये बरोबर ........युनिवर्सिटीच्या बागेत काही नवीन फुलझाडांची रोपं लावलीयेत का बघू म्हणून फेरफटका मारायला सहज आलेय. काय थंडीये ! .. हिवाळ्यात तर युनिवर्सिटीच्या आवारात एक डिग्री कमीच असतं तापमान . :) आणि मग बाईक थांबते ती थेट त्या प्रमुख इमारतीच्यापाशी असलेल्या खाणवजा जागेपाशी . इथली निःस्तब्धता मला नेहमीच भावते .शांत मांडी घालून निवांत बसावे अशी ही जागा .या खाणीच्या खोलगट जागेत पावसाचे पाणी साचून पाणथळ जागा तयार झालीये आणि या खोल खाणीच्या मधोमध असलेली एक भग्न दगडी इमारत माझ्या खोल कुतूहलाचा विषय बनून आहे .आजुबाजुला हिरव्या पिवळ्या झाडांचा background आणि मध्ये हा दगडी निरीक्षण मनोरा आणि खालील पाण्यात पडणारे त्याचे प्रतिबिंब आणि त्या पाण्यात पसरलेली हिरवीगार पाणवेल नक्षी हे सारं या जागेला एक वेगळी ओळख देतंय ..... तर इथे आल्यावर पहिली आठवण येते ती, त्या भग्न इमारतीच्या एका लाकडी तुळईवर नेमाने येऊन बसणाऱ्या निळ्या खंड्याची ! हो.... त्याची अगदी नित्याची जागाय ही . सकाळी नऊच्या सुमारास हमखास दर्शन देतो बापडा ... पण आज का कोण जाणे साहेब दिसत नाहियेत कुठे ! बाजूच्या हिरवाईत त्या निळ्या ठिपक्याच्या शोधासाठी सरावाने एका नजरेत स्कॅन केल्यावर त्याची अनुपस्थिती मनात नाराजी उमटवते . हम्म.... .. येणं बंद केलंय का काय आताशा त्याने? .नवीन जागा आवडली असावी बहुदा . तोचतोचपणाचा पक्ष्यांना देखील येऊ शकतो नं कंटाळा ......... आता कुठे जरा आजुबाजुला नजर फिरते . खारुतायांची खुराक मिळवण्याची लगबग सुरु झालीये . झाडाच्या ढोलीतून नुस्त आत बाहेर चाल्लय त्यांचं . माझी नजर पडल्यावर चमकून थबकून बघताहेत . मग फार काही धोका नाही हे समजून पुन्हा उद्योगाला लागताहेत . बाजूला सातभाई आपल्या भावंडांबरोबर एका खोलसर जागेत काही खाद्य सापडल्याच्या आनंदात गटाणा करत स्थिरावालेत . त्यांच्या एरियात एका मैनेने शिरकाव करायचा प्रयत्न केल्यावर पुन्हा गटाणा ! नुस्ता कलकलाट ...टयाव टयाव ..टयाव टयाव कर्कश्श ....आजूबाजूच्या शांततेचा भंग व्हावा इतका :) मनातूनच त्यांना गप्प बसवते . साळुंख्या मात्र आपल्या मस्त पाण्यावरून भराऱ्या घेताहेत . त्यांचा उडतानाचा तो पंखांचा काळा पांढरा contrast मला नेहमीच आवडत आलाय .एरवी मैना हा अगदी साधारण पक्षी .पण हिरव्या background उडताना मात्र देखण्या दिसतात . दोन चार साळुंख्या छानपैकी पाण्यात उतरल्यात आणि पंख घुसळून पाण्याचे तुषार उडवत बुडबुड शंभो चाल्लीये .यांचं बराय.. साबण नको ,शाम्पू नको, कंगवा नको ,रुमाल नको ...कपडे पण नकोत !.... .दोन चारदा डुबक्या मारल्या आणि पंख फडफडवले की तैय्यार. :) एका कोपर्यात चोच मानेत खुपसून समाधिस्थ बसलेला बगळा आता उडत जागा बदलतो (पुन्हा मी त्याच्या पांढऱ्या शुभ्र पंखांवर फिदा ) आणि मासे किडे हुडकत पाण्यात चोच मारायला सुरुवात करतो . तितक्यात राखी धनेशाची एन्ट्री . माझ्या डावीकडच्या झाडावरून उडत खाणीपलिकडच्या झाडाच्या उंच फांदीवर landing . याला इथे या जागेवर पहिल्यांदाच बघतेय .पलीकडच्या एका झाडावरून काही पिवळी पानं गळून पडताहेत अधून मधून ...मला आपली उगीच आपल्या लाडक्या निळ्याची आशा ! पण छ्या ,नाही ...काही दिसत नाही .दुर्बीण असती तर आत्ता शोधून काढला असता .तेवढ्यात डोक्यावरून चार हिरवे पोपट कर्कश्श उडत जातात . सातभाईनंतर याचाच नंबर कर्कश्शपणात . याला पिंजर्यातले पोपट बोलतात तस्स 'विठू विठू' करत उडायला काय होतं ?! जाऊदेत.. पुढच्या जन्मी झालेच पक्षी तर सांगेन जाऊन ;) बराच वेळ हे निरखत आठवण येते 'अरे, चला उशीर झाला .रविवार असला म्हणून काय झालं ? घरी जाऊन सर्वांच्या ब्रेकफास्टची तयारी करायचीये. निघावं आता म्हणून उठत नाही तोच ..................तितीर्र्रर्र्र्रर्रर्र्रर्र्र्रर्र्रर अशी सात 'र' असलेली लांब हाळी देत , निळे पंख पसरत खंड्या इमारती पलीकडूनच्या झाडावरून उडत येतो आणि नेमका त्या लाकडी तुळईवर बसतो ........ऊन खात आणि बहुतेक मलाच निरखत...........